

बेळगाव : जिल्हा न्यायालयाच्या आवारात महाबली चहा कॅन्टीनजवळ झहीर अब्बास मोहिद्दीनसाब हुक्केरी (वय 48, रा. असदखान सोसायटी) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मार्केट पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. सोहेल रफिक अहमद (वय 36), अरबाज आरिफ सय्यद (28, दोघेही रा. दुसरा क्रॉस सुभाषनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर हे दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी शनिवार दि. 12 रोजी मुंबई येथून या दोघांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून झहीर हुक्केरी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या उजव्या कानाला तसेच छातीला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करून पुन्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हे दोघेही फरार झाले होते.
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस आयुक्त भूषण बोरसे, पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, एसीपी संतोष डी. सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक महांतेश के. धामण्णावर, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, शशीकुमार एस. कुराळे व मार्केट पोलिस स्थानकातील कर्मचार्यांचा या पथकामध्ये समावेश होता. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.