

यवतमाळ : नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावरच तस्करांनी हल्ला केला. प्रतिउत्तरात पोलिसांनी केकेल्या फायरिंगमध्ये एक जण जखमी झाला. ही खळबळजनक घटना आज गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील वाकोडी (वाडी) येथे घडली.
रेती तस्करीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे गेले होते. यावेळी त्यांना रेती तस्करीत सहभागी पाच आरोपींनी कारवाई का करता असे म्हणत पकडून मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्यात स्वतःचा बचाव करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबुरे यांनी दोन राऊंड फायर केले. यावेळी एक गोळी एका आरोपीच्या हाताला लागल्याने तो जखमी झाला. यावेळी जखमीसह अन्य ४ आरोपी पसार झाले. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे हेसुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभय मस्के, ठाणेदार धनराज निळे, उमरखेड येथील ठाणेदार शंकर पांचाळ, मंडळ अधिकारी सचिन फटाले यांच्यासह दंगल नियंत्रण पथकाने गावात तळ ठोकला असून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाने अवघ्या आठ दिवसांपूर्वीच या परिसरातील अवैध रेती साठा जप्त केला होता. तरीही पुन्हा रेती तस्करी सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. प्रशासन व पोलीस यंत्रणेवरील थेट हल्ल्यामुळे अवैध रेती तस्करीविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.