

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा; दोन सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून २८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पुसद तालुक्यातील हनवतखेडा येथील अंकुश चव्हाण आणि पुसद येथील आदर्श नगरमधील सुमित चव्हाण असे फसवणूक झालेल्या युवकांची नावे आहे. अंकुश चव्हाण (वय २५) याने दिलेल्या तक्रारीवरून निलेश राठोड (वय ३५) रिधीर जाधव (वय ३८) लता जाधव (वय ३५) संदीप आडे (वय ३२) आणि रितेश पवार (वय ३२) या पाच जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.
२४ नोव्हेंबर २०२३ रोजी अंकुश आपल्या आतेभावाकडे गेला असता तेथे संदीप आणि निलेश भेटले. त्यांनी रिधीर व लता यांचे कुलाबा फायर स्टेशनमध्ये संबंध असल्याचे सांगितले. मंत्री गिरीश महाजन यांच्या ओळखीने रेल्वे खात्यात नोकरी लावतो, असे सांगून पैसे मागितले. दोन्ही युवकांनी टप्याटप्याने पाचही आरोपींना पैसे दिले. नोकरीबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही युवकांनी खंडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देविदास पाटील करीत आहेत.