

Undelivered Mail Found Pandharkawada Yavatmal
यवतमाळ : ज्या पोस्टमनकडे विश्वासाने पाहिले जाते, त्याच विश्वासाला हरताळ फासल्याचा प्रकार पांढरकवडा येथे समोर आला आहे. कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या एका पोस्टमनने चक्क नागरिकांच्या महत्त्वाची कागदपत्रे आणि पत्रे न वाटता आपल्या घरात दडवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. सतीश धुर्वे असे या पोस्टमनचे नाव असून, त्याच्या घरातून सरकारी कागदपत्रे, कॉल लेटर्स आणि बँकिंग कार्ड्सची तब्बल तीन पोती जप्त करण्यात आली आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे पांढरकवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पांढरकवडा येथील एका ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला. मागील वर्षभरापासून त्यांची कायदेशीर पत्रे आणि महत्त्वाची पुस्तके टपालातून गायब होत होती. त्यांनी संशयावरून तक्रार केल्यानंतर दि. २२ डिसेंबर रोजी पोस्टमन सतीश धुर्वे याच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांना घरात धुळीने माखलेली तीन मोठी पोती सापडली.
ही पोती उघडली असता त्यामध्ये बेरोजगारांच्या नोकरीचे कॉल लेटर्स, बँकांचे एटीएम, क्रेडिट कार्ड्स, विमा पॉलिसी, आधार कार्ड आणि महत्त्वाच्या न्यायालयीन नोटिसांचा खच आढळला. ही सर्व कागदपत्रे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याऐवजी धुर्वेने ती घरातच पोत्यात भरून ठेवली होती.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून वणी उपविभागीय पोस्टमास्तरांचा चौकशी अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी पोस्टमन सतीश धुर्वे याच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन यवतमाळ मुख्य डाकघर अधीक्षक मोहन निकम यांनी दिले आहे.