Yavatmal Robbery Case
यवतमाळ : मध्यरात्री घरात शिरून चार जणांनी शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकत एक लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास केला. पुसद तालुक्यातील पाळोदी येथे शनिवार दि. २८ जून रोजी मध्यरात्री २.३० वाजताचे सुमारास ही घटना घडली. गावात दरोडा पडल्याने गावकऱ्यात धास्ती निर्माण झाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
रमेश श्रीराम बांडे (वय ४९) हे शेतकरी असून दुधाचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते जेवण करून रात्री दहा वाजताच्या दरम्यान वरच्या मजल्यावर पत्नी व मुलगी तर खालच्या हॉलमध्ये मुलगा व रमेश बंडे झोपले होते. रात्री अचानक त्यांना काही पडल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी उठून पाहिले असता काही जण त्यांच्या घरामध्ये शिरल्याचे दिसून आले.
कुठलीही हालचाल करण्यापूर्वी दरोडेखोरांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर दरोडेखोरांनी तुमच्याकडे सोने, चांदी व नगदी कुठे ठेवली आहे, असे मराठीत विचारू लागले. बांडे यांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यानंतर दरोडेखोरांनी तुमचे एवढे मोठे घर आहे, तुमच्याकडे सोने-चांदी नगदी नाही का असे विचारले. त्यानंतर काही दरोडेखोर वरच्या मजल्यावर गेले.
वरच्या मजल्यावरील कपाटात ठेवलेले १ लाख ८५ हजार ४३५ रुपयाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने व नगदी ७ हजार रुपये असा एकूण १ लाख ९२ हजार ४३५ रूपयाचा मुद्देमाल घेवून पसार झाले. रमेश बांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दरोडेखोराविरोधात पुसद शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.