

यवतमाळ : पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या अज्ञात मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बंधाऱ्यात फेकला होता. बिटरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शिलाई मशिनच्या एका लेबलवरून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ९ जानेवारी २०२६ रोजी एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यवतमाळ पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासासाठी चार पथके तैनात केली होती. तपासादरम्यान हिंगोली, नांदेड आणि तेलंगणा सीमावर्ती भागातील पोलिस पाटलांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी जलदरा (ता. किनवट) येथील पोलिस पाटील सुरेश वाघमारे यांनी मारोती गंगाराम डुकरे (६०) हे बेपत्ता असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी संशयावरून मृताचा मुलगा प्रदीप मारोती डुकरे (२५) आणि पत्नी पार्वताबाई मारोती डुकरे यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी संशयिताच्या घराची झडती घेतली असता, मृतकाच्या कपड्यांवर आणि घरातील इतर कपड्यांवर सिटी मेन्स टेलरचे सारखेच शिलाई लेबल आढळले. या तांत्रिक पुराव्यामुळे संशय बळावला आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी प्रदीपने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.