

Accused killed in Yavatmal
यवतमाळ : वर्षभरापूर्वी शहरात झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपी पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आला. तेव्हापासूनच त्याच्यावर पाळत ठेवून खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी संधी मिळताच, धारदार शस्त्राने वार करून त्या आरोपीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे वर्दळीच्या चांदणी चौक परिसरात खळबळ उडाली.
मनीष सागर शेंद्रे (वय २५, रा. रमाई पार्क क्र. २ यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. मनीषवर गोळी झाडून एकाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या गुन्ह्यात तो जानेवारी २०२४ पासून कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला यवतमाळ शहरात राहू नको, तुझ्या जीवाला धोका आहे, अशी सूचना दिली होती. त्यानंतरही मनीष यवतमाळमध्ये फिरत होता.
मंगळवारी मनीष त्याची दुचाकी दुरुस्त करण्यासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर असलेल्या गॅरेजवर आला होता. त्याने तेथे दुचाकी दुरुस्तीला टाकली, याची टीप पाळतीवर असलेल्या मारेकऱ्यांना मिळाली. त्यावरून मारेकरी याच परिसरात दबा धरून होते. दुचाकी घेण्यासाठी मनीष तेथे पोहोचला असता, चौघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला.
शरीरावर अनेक घाव लागूनही मनीष त्यांच्या तावडीतून निसटला. मात्र, काही अंतर पुढे जाऊन आरएफओ कार्यालयाच्या फाटकासमोर कोसळला. त्यानंतर, पुन्हा हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तो ठार झाला की नाही, याची खात्री केली. नंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.