

यवतमाळ : एका महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या तिच्या राहत्या घरी आढळून आला होता. ही घटना सोमवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास घाटंजी तालुक्यातील इस्तारीनगर खापरी येथे उघडकीस आली. हा आकस्मिक मृत्यू की घातपात असा संशय निर्माण झाला असतानाच अनैतिक संबंधातून प्रियकराने तिची हत्या केल्याची बाब आता पोलिस तपासात समोर आली आहे. प्रिती सचिन डाखरे (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. अजय नेवारे (वय २८, रा. कोंडजई ता. घाटंजी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.
प्रिती ही घाटंजी शहरातील इस्तारी नगर परिसरातील सरला मडावी यांच्या घरी भाड्याने राहत होती. तिच्या पतीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घटनेच्या रात्री प्रितीने प्रियकर अजय नेवारे याला कॉल करून घरी बोलविले. तो घरी येताच प्रितीने लग्नासाठी तगादा लावला. त्यावेळी आरोपीने माझे दोन महिन्यानंतर लग्न आहे. मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, असे म्हटले. त्यानंतर आरोपी अजय व प्रिती यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान आरोपी अजय याने महिलेला ठार करून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास प्रीतीच्या वडीलांना दूरध्वनीवरून संपर्क करून तुमच्या मुलीने विषारी औषधी प्राशन करून जीवन संपविल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपासचक्रे फिरविली. आज मंगळवारी संशयित आरोपीला ताब्यात घेत विचारणा केली असता त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी अजयविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर करीत आहेत.