

यवतमाळ : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा दोष सिद्ध झाल्याने निर्दयी मातेसह तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी गुरुवारी (दि.१२) या प्रकरणाचा निकाल दिला.
नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (वय ४५) आणि शोभा दमडू चव्हाण (वय ५०) दोघेही रा. मोझर ता. नेर अशी शिक्षा ठोठवण्यात आलेल्या प्रियकरासह निर्दयी मातेचे नाव आहे. तर कमल दमडु चव्हाण (वय ३०) असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी ३ ऑगस्ट २०२० रोजी ते दोघेही शोभाच्या घरात होते. दरम्यान, शोभाचा मुलगा कमल हा तिथे पोहोचला. दोघांना नको त्या अवस्थेत बघितले, गावात बदनामी होणार या भीतीतून दोघांनी लोखंडी सराट्याने वार करून कमल याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह गावातील स्मशानभूमीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी शोभानेच अज्ञात आरोपीविरोधात मुलाचा खून केल्याची तक्रार दिली. नेर ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांना या घटनेचा प्रत्यक्षदर्शी मिळाला. त्यावरून शोभा व तिचा प्रियकर नरेंद्र या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच कमलचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज कावरे व कमल याची पत्नी या दोघांचेही बयाण नोंदविले. ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे व ठाणेदार प्रशांत मसराम यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज कावरे हा फितूर झाला. मात्र, सरकारी वकील अॅड. मंगेश गंगलवार यांनी न्यायालयापुढे परिस्थितीजन्य पुरावे, डॉक्टरांचा अहवाल, इतर साक्षीदार उभे करून त्या दोघांनीच गुन्हा केल्याचे सिद्ध केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपींना शिक्षा ठोठावली. आरोपी नरेंद्र व शोभा यांना कलम ३०२, ३४ नुसार आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. नरेंद्र ढेंगळे याला ५० हजार रुपये दंड, शोभा चव्हाण हिला १० हजार रुपये दंड केला. ही रक्कम मृत कमल चव्हाण याची पत्नी व तीन मुलींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश केला. या खटल्यात सहकारी वकील मंगेश गंगलवार यांना कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महेंद्र चरणदास भोवते यांनी सहकार्य केले.