Yavatmal Mahagaon Minor Girl Harassment
उमरखेड : अल्पवयीन विद्यार्थिनीशी कथित गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून महागाव तालुक्यातील गुंज येथे गुरुवारी (दि. २२) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संशयित ४२ वर्षीय संशयिताला मारहाण केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही जमावाचा रोष कायम राहिला. संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घातल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंज येथील एका विद्यालयात शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेच्या परिसरात असताना संबंधित इसमाने तिला फूस लावून बाहेर नेल्याचा आरोप आहे. शाळेमागील शेत परिसरात दोघे आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. त्यानंतर काही नागरिकांनी संबंधित इसमाला पकडून मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच महागावचे ठाणेदार सेवानंद वानखेडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून संशयिताला ताब्यात घेतले. मात्र, त्याला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला संतप्त जमावाने घेराव घातला. काही जणांनी पोलीस वाहन उलटविण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे.
जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे बसस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे-पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात घटनास्थळी दाखल झाले. भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीही घटनास्थळी पोहोचून नागरिकांशी संवाद साधला. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून तपास आणि कायदेशीर कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. संशयिताविरुद्ध कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपासात नेमकी कोणती तथ्ये समोर येतात, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. संबंधित आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.