

Yavatmal Youth Dies Of Electric Shock
यवतमाळ : पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतातील तार कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केळापूर तालुक्यातील घनमोड सोसायटी येथे घडली. आकाश सुखदेव येवले (वय 25), असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश हा शेती व दुग्धव्यवसाय करीत होता. रविवारी सकाळी तो मित्र अखिल मुरलीधर डोळे याच्यासोबत गुरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. सायंकाळी गुरे घेऊन गावाकडे परतत असताना अरविंद डोळे यांच्या शेताजवळून जाताना शेताच्या कुंपणाला लावलेल्या उघड्या तारेचा आकाशच्या पायाला स्पर्श झाला. या तारेत विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याने विजेचा तीव्र धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. शेताच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाच्या तारेत विद्युत खांबावरून अनधिकृतपणे थेट वीजप्रवाह सोडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कोणतीही सुरक्षितता न बाळगता विद्युत प्रवाह सोडल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ राजेंद्र सुधाकर येवले (वय 35, रा. घनमोड सोसायटी) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अरविंद मधुकर डोळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद घोटेकर पुढील तपास करीत आहेत.