

यवतमाळ : शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्यावरून झालेल्या वादात लहान भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाची हत्या केली. महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे आज मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील रहिवासी नीलेश अशोक रिंगे (वय ३७) असे मृतकाचे नाव आहे. तो आज आपल्या शेतात गेला असता त्याला त्याठिकाणी लहान भाऊ प्रदीप (वय ३३) हा मुगाच्या शेंगा तोडताना दिसला. त्याने याबाबत त्याला हटकले असता दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आरोपी प्रदीपने आपल्या भावाच्या तोंडावर काठीने जबर मारहाण केली. यात निलेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावासह परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी धाव घेत घटनेची माहिती महागाव पोलिसांना दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार धनराज निळे, उपनिरीक्षक देवानंद कायंदे, बिट जमादार विनोद जाधव, जमादार केशव चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला. भावाची हत्या करून आरोपी प्रदीप हा घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु, प्रदीप हा चकमा देत होता. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांच्या साथीने आरोपीला अवघ्या एका तासात अटक केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.