

1.58 Crore Fraud Yavatmal
यवतमाळ : बनावट कंपनी तयार करून जादा परताव्याचे आमिष दाखवित गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ५८ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दिग्रस येथे उघडकीस आली असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले.
वृषाली संजीवकुमार गुडपेल्लीवार (वय ५१, रा. पाटीलनगर, दिग्रस) असे फिर्यादीचे नाव आहे. मनोज अशोक पाटील (वय ४५, रा. वर्धा), गिरीष किसनराव दुधे (वय ३०, रा. दिग्रस), विनोद किसनराव दुधे (वय ४५, रा. दिग्रस), पुष्पांजली दिनेश रंधेरिया (वय ४५, रा. वर्धा) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी संगनमत करून ग्रो कॅपिटल कंपनी विश्वांजली व्हेचर एलएलपी नावाची कंपनी स्थापन केली. त्यानंतर विविध प्रलोभने दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यामुळे फिर्यादी वृषाली गुडपेल्लीवार यांनी मुलगा ओमकार याच्या नावे २० लाख, मुलगी वैष्णवीच्या नावे १० लाख असे ३० लाख रुपये गुंतविले. तसेच त्यांचा भाऊ परेश कथळकर (रा. पुसद) यांनी एक लाख गुंतवणूक करण्यासाठी दिले होते. त्याचीही आरोपींनी फसवणूक केली. मालती ज्ञानेश्वर मराठे एक लाख, कैलास तानसा जाधव ३५ लाख, अनिल नारायण चव्हाण दोन लाख, तर शुभांगी प्रकाश कोरके यांनी ४६ लाख असे एकूण १ कोटी ५८ लाख रुपये आरोपींना देण्यात आले होते.
दि. ६ एप्रिल २०२५ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही गुंतवणूक करण्यात आली. त्याचा मोबदला १० टक्के मुद्दल रकमेवर तर पाच टक्के नफा अशा पद्धतीने तीन महिन्यांपर्यंत देण्यात आला. मात्र, त्यानंतर परतावा मिळणे बंद झाले. याबाबत आरोपींशी संपर्क साधला तर ते प्रतिसाद देत नव्हते. कालांतराने फोन बंद येत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी दिग्रस पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून पाचही आरोपींवर गुन्हे दाखल करून गिरीष दुधे व विनोद दुधे या दोघांना अटक केली आहे.