

यवतमाळ : वीज कोसळून झाडाखाली उभ्या असलेल्या तब्बल २२ शेळ्या ठार झाल्या. मारेगांव तालुक्यातील वरुड येथे रविवारी (दि.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. यात पशुपालकाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मारेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. नेहमीप्रमाणे भारत तुकाराम गेडाम हे रविवारी शेळ्या घेऊन चारावयास गेले होते. सायंकाळी पाच वाजेदरम्यान शेळ्या परत आणत असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे गेडाम यांनी आपल्या शेळ्या कवडू जुमनाके यांच्या शेतातील झाडाखाली उभ्या केल्या. यादरम्यान या झाडाखाली शेळ्या थांबल्या असताना वीज कोसळ्याने २२ शेळ्या जागीच ठार झाल्या. हे बाब निदर्शनास येताच भारत गेडाम हे भोवळ येऊन खाली कोसळले. त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.