

Digras Lightning Strike Kills Goats Sheep
दिग्रस : तालुक्यातील आमला येथील जंगल शिवारात बुधवार १६ सप्टेंबर रोजी रात्री भीषण दुर्घटना घडली. वीज कोसळल्याने शेळ्या-मेंढ्याचा संपूर्ण कळप जागीच ठार झाला. दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील मारुती गोमाजी महानर हे शेळ्या-मेंढ्यांसह शिवारातील आमला जंगलात वाड्यावर गेल्या होत. दोन महिन्यांपासून ते तिथेच वास्तव्यास होते. त्यांच्याकडे एकूण ६५ शेळ्या व मेंढ्या होत्या.
बुधवारी रात्री अचानक झालेल्या विजांच्या कडकडाटात वीज त्यांच्याच वाड्यावर कोसळली. यात ३३ मेंढ्या-शेळ्या जागीच ठार झाल्या तर २२ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. याच शिवारात इतर ४ ते ५ शेळ्या-मेंढ्यांचे वाडेही होते. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सहाय्यक आयुक्त अशोक धुर्वे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण जाधव, पशुधन विकास अधिकारी पी. एस. नरांजे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. नियमानुसार सर्व मृत शेळ्या व मेंढ्यांचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने मारुती महानर यांना त्यांच्या नुकसानाची पूर्ण भरपाई द्यावी, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष यादव गावंडे यांनी केली आहे.