Yavatmal Crime : महागाव ग्रामीण रुग्णालयावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला, नर्सिंग ऑफिसरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

महिला डॉक्टरांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून वाचवला जीव
AI Image
AI Image
Published on
Updated on

यवतमाळ : महागाव येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. हल्लेखोर लोखंडी रॉड घेऊन अंगावर धावून आल्याने महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी प्रसूतीगृहातील (डिलिव्हरी रूम) बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेत जीव वाचवला. दरम्यान, एका पुरुष नर्सिंग ऑफिसरला हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

महागाव तालुक्यातील अंबोडा येथील शेख इसराइल शेख शाबुद्दीन (वय ३०) हा मंगळवारी अपघातात जखमी झाला होता. रात्री सुमारे दहा वाजता त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे यांनी त्याच्यावर प्रथमोपचार व मलमपट्टी केली. मात्र, उपचाराने समाधान न झाल्याचा आरोप करत त्याने उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी वाद घालून धमक्या दिल्या. त्यानंतर तो निघून गेला खरा, पण काही वेळातच १० ते १२ जणांचे टोळके सोबत घेऊन पुन्हा रुग्णालयात आला.

AI Image
Yavatmal Crime : दुसऱ्या लग्नात अडसर ठरत असलेल्या पत्नीला पेटविले; उपचारादरम्यान मृत्यू

हॉस्पिटलमध्ये शिरताच टोळक्याने तोडफोड, गोंधळ आणि मारहाण सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा मुजमुले व नर्सिंग ऑफिसर पूनम कोकरे या दोघींनी बाथरूममध्ये लपून स्वतःचा जीव वाचवला. दरम्यान, ‘डॉक्टर कुठे लपल्या आहेत?’ अशी विचारणा करत हल्लेखोरांनी नर्सिंग ऑफिसर प्रशीक काळबांडे यांना लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी तुडवले. गंभीर जखमी झाल्याने काळबांडे यांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी प्रसूतीगृहाच्या काचा फोडत ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे भयभीत झालेल्या डॉ. मुजमुले आणि पूनम कोकरे यांनी पोलिसांना फोन केला; मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी पळ काढला. या प्रकरणी डॉ. दीक्षा मुजमुले यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी शेख इसराइल शेख शाबुद्दीन व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, "डॉक्टरांवरच हल्ले होणार असतील तर रुग्णांची सेवा कशी करायची?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

AI Image
Yavatmal Crime : अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्याला चार वर्षांचा कारावास

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांना तातडीने अटक करावी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, या मागणीसाठी ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कामबंद आंदोलन पुकारले. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी तहसीलदारांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.

"आम्हाला दया नको, सुरक्षेची हमी द्या" "रुग्णांवर उपचार करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला बाथरूममध्ये लपून बसावे लागले. काचा फुटण्याचा आवाज आणि जीवे मारण्याच्या धमक्या ऐकून थरकाप उडाला होता. जर आमचा जीव गेला असता, तर कुटुंबाचे काय झाले असते? आता पुन्हा कामावर येण्याची हिंमत होत नाही. आम्हाला दया नको, तर सुरक्षेची ठोस हमी हवी."

— पूनम कोकरे, नर्सिंग ऑफिसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news