

यवतमाळ : दुसऱ्या लग्नात अडसर ठरत असलेल्या पत्नीला पतीने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीररीत्या होरपळलेल्या विवाहितेचा चार दिवसांनंतर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ तालुक्यातील मेंढला येथे घडली असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चैताली उर्फ आयेशा जुबेर सिद्दीकी (वय ३५, रा. मेंढला) असे मृत विवाहितेचे नाव आहे; तर जुबेर बदर हसन (वय ४०) असे आरोपी पतीचे नाव आहे. जुबेर आणि चैताली यांचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्यानंतर जुबेरचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो पत्नी चैताली हिचा सतत शारीरिक व मानसिक छळ करत होता. याच कारणावरून १४ ऑगस्ट रोजी सकाळी जुबेरने संतापाच्या भरात चैतालीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या चैतालीने जिवाच्या आकांताने घराबाहेर धाव घेतली. तिला तत्काळ यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेत पती जुबेरही भाजला असून, सध्या त्याच्यावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर पीडित महिलेचा भाऊ सचिन बोंदाडे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला आरोपी पती जुबेरविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) (खुनाचा प्रयत्न) आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गंभीर जखमी झालेल्या चैतालीवर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. चार दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती; अखेर मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. विवाहितेच्या मृत्यूनंतर ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय घाडगे करत आहेत.