

यवतमाळ : भरधाव ट्रक व बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर आठजण गंभीर आणि दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास वणी-यवतमाळ राज्य मार्गावरील जळका फाट्यावर घडली.
नवनाथ शिवाजी काचे (वय ३०, रा. अंकुलगा, जि. लातुर), भीमराव मरस्कोल्हे (वय ५०, रा. मंगी, ता. केळापूर) अशी मृतांची नावे आहेत. शुभम ढोंबरे, रोहित योकनकर (रा. मोहदा), सचिन झिलपे (रा. बोटोनी),
अमोल टेकसे (रा. मेटीखेडा), संतोष खिलके (रा. किंगा), प्रसाद चिंचोळकर (रा. मेटीखेडा), विमल मरस्कोल्हे (रा. मंगी), दुर्गा ठाकरे रा. ब्रह्मपुरी, नरेंद्र मडावी (रा. मंगी), भीमराव मडावी (रा. मंगी) अशी गंभीर जखमींची नावे असून, त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, इतर दोन किरकोळ जखमींना पांढरकवडा येथील रुग्णालयात भरती केले आहे.
एमएच ४० वाय ५७८२ क्रमांकाची बस वणी येथून यवतमाळला जात होती. तर एमएच २८ बीबी ५८२७ क्रमांकाचा ट्रक वणीकडे येत होता. दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक बसली. या अपघातात बस एका बाजूने पूर्णतः कापल्या गेली. अपघात घडताच चालक बेशुद्ध पडल्याने बस २०० मीटर लांब जात रस्त्याच्या खाली उतरून थांबली. यावेळी वणीचे आमदार संजय देरकर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सर्व जखमी व मृतांना गावकऱ्यांच्या सहकार्याने करंजी व पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये १५ प्रवासी, चालक, वाहक होते.