

यवतमाळ : भरधाव कार दुभाजकावर धडकली यात ऑटोडिल व्यावसायिकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी आहेत. लग्न सोहळ्यासाठी यवतमाळातील पाच मित्र एमएच ३३ व्ही ३१३१ क्रमांकाच्या कारने नागपूर येथे गेल होते. रात्री परत येत असताना नागपूर-यवतमाळ मार्गावर कळंब शिवारातील कामठवाडा गावादरम्यान सोमवारी रात्री १ वाजता हा अपघात झाला.
रवींद्र उत्तमराव म्हेत्रे (५२, रा. तळेगाव, ता. दारव्हा, ह.मु. उज्ज्वलनगर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. तर निखिल दौलतकार, महेश ढंगरे, शंकर जयस्वाल (तिघेही रा. यवतमाळ) हे गंभीर जखमी आहेत.
त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे, तर सागर भालेराव है किरकोळ जखमी झाले. कारने यवतमाळकडे येत असताना कामठवाडा शिवारात अचानक आडवे रानडुक्कर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार दुभाजकावर धडकून तिने पलटी घेतली. अपघात झाल्यानंतर तातडीने जखमींना यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रवींद्र म्हेत्रे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर तिघांना नागपूर येथे रेफर केले. कळंब पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.