Bacchu Kadu | दुष्काळात कर्जवसुलीचा तगादा : फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप बच्चू कडूंनी हातोड्याने तोडले

आर्णी तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप आमदार बच्चू कडू यांनी स्वतः हातोड्याने तोडले
 Bacchu Kadu
बच्चू कडू (File Photo)
Published on: 
Updated on: 

Yavatmal Bacchu Kadu Hammer Action

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप आमदार बच्चू कडू यांनी स्वतः हातोड्याने तोडले. कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला. दुष्काळात कर्जवसुलीचा तगादा लावणार्‍या फायनान्स कंपन्यांना गावबंदी करा, एक खडकूही भरू नका, असे थेट आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी उपस्थित होते. 

आमदार कडू यांनी 1 नोव्हेंबर रोजी देऊरवाडी येथे भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. देऊरवाडी येथील रवी संजय पत्रे यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी घराच्या बांधकामासाठी होम फायनान्स लिमिटेडकडे कर्ज घेतले होते. कंपनीने 5 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले.

 Bacchu Kadu
Bacchu Kadu : दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट, ‘आप्पांना’ लाल दिवा मिळायलाच हवा; बच्चू कडूंचा पाचोऱ्यात गौप्यस्फोट!

मात्र, प्रत्यक्षात 2 लाख 71 हजार रुपये मिळाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यापैकी 30 हजार रुपये भरल्याची माहिती रवी यांचे वडील संजय पत्रे यांनी दिली. हाताला काम नसल्याने पत्रे कुटुंबीय मजुरीसाठी पुण्याला गेले होते. त्यामुळे देऊरवाडीतील त्यांच्या घराला कुलूप होते.

याचदरम्यान, 30 सप्टेंबर रोजी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी पोलिस बंदोबस्तात गावात आले. त्यांनी कुटुंबीयांचे कुलूप काढून कंपनीचे कुलूप लावले आणि घर सीलबंद केल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात 2 लाख 71 हजार रुपये मिळाले असताना आणि काही रक्कम परत भरली असतानाही सुमारे सहा लाख रुपये भरण्याचा तगादा लावला जात असल्याची बाब आमदार कडू यांच्यापर्यंत पोहोचली.

 Bacchu Kadu
Bacchu Kadu | रायगड येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणार : बच्चू कडू

त्यानंतर आमदार कडू यांनी देऊरवाडी गाठत घराला लावलेले कुलूप हातोड्याने तोडले. घराचा दरवाजा उघडून पत्रे कुटुंबीयांना पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला. वसुलीसाठी गावात येणार्‍या प्रतिनिधींनी अरेरावी केल्यास ग्रामस्थांनी एकजूट दाखवावी. संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीशी गावाने उभे राहावे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. 

माजी सरपंचाची आत्महत्या

आर्णी तालुक्यातील बेलोरा (वन) येथील माजी सरपंच रवींद्र देवराव मनवर यांनी फायनान्सच्या कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आमदार बच्चू कडू यांनी बेलोरा येथे भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. मनवर यांच्या पत्नी, त्यांच्या दोन दिव्यांग मुलांची भेट घेऊन धीर दिला. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.