

यवतमाळ : वणी शहरातील गाडगेबाबा चौकातील कोंडावार ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या एका घरात दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर फिल्मी स्टाइल दरोडा टाकला. यावेळी सोने व रोख रक्कम असा अंदाजे २० लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी उघडकीस आली.
संजय निळकंठराव कोंडावार हे शहरातील गाडगेबाबा चौक परिसरात राहतात. त्यांच्या दुकान व घराकरिता विलास वाडके नामक चौकीदार होता. पहाटे चार दरोडेखोर आले व त्यांनी चौकीदारांशी झटापट केली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. कोंडावार यांना धारदार शस्त्र व चाकूचा धाक दाखवून त्यांचे हात-पाय, तोंड बांधून त्यांच्याकडील असलेल्या सोन्यावर व पैशावर डल्ला मारला.
यात अंदाजे १२ तोळे सोने व रोख अंदाजे साडेचार लाख रुपये असा एकूण २० लाखांच्यावर मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. त्यानंतर ते दोघेही कसेबसे सुटले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वणी पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील मुख्य चौक परिसरात दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे.