

यवतमाळ : कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून उसळली आणि थेट महामार्गाच्या दुसऱ्या लेनवर गेली. यादरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवार (दि. ३१) सकाळी ११ च्या सुमारास वणी-घुघुस मार्गावर घडली.
वणी येथील भीम नगरातील रहिवासी रियाज शेख (वय ५५) यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. आज (शुक्रवारी) सकाळी ते त्यांच्या ३ मुली व भावाच्या चार वर्षीय मुलीला घेऊन घुग्घुस मार्गावर (०१एएच ५७००) क्रमांकाची कार घेऊन गेले होते. त्यांची मुलगी लियाबा (वय २०) ही कार चालवत होती. लालगुडापूर्वी ओम नगरीजवळ वळण घेताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला धडक बसली. अपघात इतका भीषण होता, कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी रियाज यांची मुलगी लियाबा (२०), मायरा (१७), अमिरा यांना मृत घोषीत केले. वडील रियाज यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांच्या भावाच्या ४ वर्षाच्या मुलीला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.