

Woman dies of electric shock while filling water using an electric pump
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
वीजपंपाद्वारे पाणी भरताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. वणी शहरात शास्त्रीनगरातील मोक्षधामजवळ आज मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
छाया नंदकिशोर घुले (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. वणी शहरातील बहुतांश भागात नळाला वीजपंप लावून ओढल्याशिवाय पाणी मिळत नाही. छाया घुले आपल्या घरी मोटारीद्वारे पाणी भरत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या आकस्मिक घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.