

वणी तालुक्यातील कायर लगतच्या पठारपूर येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याचे नाव प्रमोद कवडू गारघाटे (वय ५५) असे असून ते आपल्या शेतातील मोटरपंप सुरू करण्यासाठी गेले होते. पिकांना पाणी भरण्यासाठी मोटरपंप सुरू करताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या या धक्क्याने ते जागीच कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर तातडीने ग्रामस्थांनी गारघाटे यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मृत शेतकऱ्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार असा त्यांचा परिवार आहे. या घटनेने पठारपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपुरवठा व सुरक्षितता याकडे विद्युत विभागाने अधिक लक्ष द्यायला हवे. विजेच्या अशा धोकादायक अपघातांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी सतत भीतीत आहेत.