

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकीचा भीषण अपघात होऊन यात पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही अपघाताची भीषण घटना घाटंजी तालुक्यातील घाटंजी-सोनखास मार्गावर दहेली ते सायखेडा दरम्यान बुधवारी (ता.५) रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. जखमींना यवतमाळ येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
महावितरणने रस्त्याच्याकडेला ठेवलेल्या पोलवर थेट दुचाकी जाऊन आदळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळावर उपस्थितांकडून सांगण्यात आले. संदीप बट्टे (रा. दहेली) आणि अंकुश आडे (रा. येळाबारा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
लक्ष्मण रामभाऊ बट्टे, विक्की राजु बोरकुडे, निकेश नैताम अशी अपघातातील जखमींचे नाव आहेत. दहेलीकडून घाटंजीकडे येत असलेल्या दुचाकीला घाटंजीकडून येळाबाराकडे जात असलेल्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्याकडेला टाकून असलेल्या विद्युत पोलवर कोसळल्या. दरम्यान दुचाकी चालकांचे डोके पोलवर आदळल्याने यात दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. महावितरणने रस्त्याच्याकडेला अस्ताव्यस्त पद्धतीने पोल टाकून ठेवल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.