

यवतमाळ : नवीन दुचाकी वाहन कमी किमतीमध्ये खरेदी करून देतो, असे सांगून एका युवकाने तब्बल १७ नागरिकांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील कोल्ही या गावासह इतरही गावात उघडकीस आला. याबाबत नागरिकांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील फाळेगाव येथील रहिवासी असलेला वैभव शांताराम लांडगे (वय ४०) याने यवतमाळ येथील एका फायनान्स कंपनीत काम करीत असताना कोल्ही येथील दिपक देविदास नागेकार यांना नवीन दुचाकी फक्त ७० ते ८० हजार रुपयांमध्ये घेवून देतो असे सांगितले. त्यासाठी जुनी दुचाकी बदली करून नवीन दुचाकी घेण्याचे व त्याचा व्यवहार करण्याचे ठरविले. लाख रूपयाच्यावर पडत असलेली नवीन दुचाकी कमी किमतीत मिळत असल्याने नागेकार यांनी होकार दिला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या ओळखीतील आणखी काही लोकांना याबाबत सांगितले. त्यानंतर वैभव लांडगे याने यवतमाळ येथील विविध कंपन्यांच्या तीन शोरूममधून तब्बल १७ लोकांना दुचाकी घेवून दिल्या. त्यासाठी त्यांच्या जवळील जुन्या दुचाकींना बदली करून वरील रक्कम नगदी व ऑनलाइन स्वरूपांत घेण्यात आली.
काही दिवसांनी दुचाकी त्यांना देण्यात आल्या. कमी पैशात दुचाकी मिळाल्याने सर्व आनंदात असताना काही लोकांना विशिष्ट फायनान्स कंपन्यांकडून हप्ते थकल्याचे फोन, मेसेज येवू लागले. हा काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी या लोकांनी दुचाकी शोरूम गाठले. त्यावेळी त्यांना समजले की प्रत्येक वाहनांवर फायनान्स कंपन्यांचे कर्ज उचलले आहे व त्याचे काही हप्ते नियमित भरले गेले असून उर्वरीत हप्ते थकीत असल्याचे सांगितले. त्यामुळे या लोकांनी आपण नगदी वाहने खरेदी केली तर कर्ज कशाचे व कुणी काढले. यासाठी वैभव लांडगे याच्या घरी जावून विचारपूस केली. त्यावेळी वैभवने तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुमचे हप्ते मी भरतो असे म्हणून समजूत काढली. मात्र, त्याचवेळी यातील काही लोकांनी गोंधळ घातला. त्यामुळे वादाची स्थिती निर्माण झाली. वैभव लांडगे उडवाउडवीची उत्तरे देत आता मी पैसे भरत नाही, तुमच्याने जे होईल ते करून घ्या, अशी धमकी दिली. त्यामुळे दिपक नागेकार व इतर सर्व १६ लोकांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी पोलीस काय कार्यवाही करतात, याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.