

यवतमाळ: घरगुती वादातून मुलानेच वडिलांचा खून केला. घाटंजी तालुक्यातील एरंडगाव येथे ही हृदयद्रावक घटना गुरुवार दि. २ सप्टेंबरला सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुंडलीक दाऊजी कांबळे (वय ५५) असे मृताचे तर आदर्श पुंडलीक कांबळे (वय २५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. दोघात नेहमी वाद होत असत. घटनेच्या दिवशीही वाद झाला, पुंडलीक कांबळे अंगणात उभे असताना मुलगा आदर्श याने फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात पुंडलिक कांबळे बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपी घराबाहेर निघून गेला.
आजारी अवस्थेत असलेल्या पुंडलिक यांच्या पत्नीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. त्यामुळे काही ग्रामस्थांनी घटनास्थळी जात पुंडलिक कांबळे यांना खासगी वाहनाने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना पोलिस दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
पारवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे करीत आहेत.