

उमरखेड : श्रावण महिना म्हणजे निसर्गाची उधळण! पावसाचे सरी, हिरवीगार वनराई, वाहणारे झरे आणि दुधासारखा फेसाळणारा धबधबा याचं सजीव चित्र सध्या उमरखेड तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य आणि सहस्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर आंध्रप्रदेश, महाराष्ट्र व इतर राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.
पैनगंगा अभयारण्य अंदाजे ३२५ चौरस कि.मी. क्षेत्रात पसरले असून या वनक्षेत्रात जैवविविधतेचा अनमोल ठेवा दडलेला आहे. येथे साग, टेंभुरणी, अर्जुन, बिब्बा, हरडा, मोहफुल बेहडा, अश्वगंधा, गुळवेल यांसारख्या अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून संशोधक, आयुर्वेद अभ्यासक आणि निसर्गप्रेमी अभयारण्यात दाखल होत आहेत. बिटरगाव, सोनदाभी, मदनापूर या भागांतून अभयारण्यात प्रवेश करता येतो. वन्यजीव निरीक्षणासाठी योग्य रचना करण्यात आलेली असून निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेला सहस्रकुंड धबधबा पावसाळ्यात पूर्ण तेजाने वाहतो. पैनगंगा नदीच्या पात्रात तयार होणारा हा धबधबा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. धबधब्याचा गर्जना आणि त्यातून उडणारा धुरकट फेस पाहताना पर्यटक हरखून जातात. या धबधब्याला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. धबधब्याच्या परिसरात जिल्हा परिषद आणि वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी विश्रामगृह, बसण्यासाठी जागा, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होतो आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पाडुंरग शिंदे आणि दराटीचे पोलिस उपनिरीक्षक योगेश वाघमारे हे आपल्या पथकासह चोख बंदोबस्त ठेवत आहेत. महिला पर्यटकांसाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी तैनात असून, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.
पैनगंगा अभयारण्याचे डी.एफ.ओ. यांच्या मार्गदर्शनाखाली ए.सी.एफ. झांबरे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी सुदर्शनपांडे (बिटरगाव धिरज मदने) हे वेळोवेळी पर्यटकांशी संवाद साधून अभयारण्यातील वनसंपदेचे महत्त्व समजावून सांगत आहेत.
श्रावण महिन्यात पैनगंगा अभयारण्य आणि सहस्रकुंड धबधबा पर्यटकांसाठी केवळ निसर्गदर्शन नाही, तर एक आध्यात्मिक, शारीरिक व मानसिक ताजेपणाचा अनुभव आहे. निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालवण्यासाठी हे सुंदर ठिकाण ठरत आहे.
निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना स्वच्छता राखा
प्लास्टिक, कचरा यांचे व्यवस्थापन करा
वन्यप्राण्यांना त्रास देऊ नका
अधिकाऱ्यांचे निर्देश पाळा
आपत्कालीन स्थितीत पोलिस किंवा वनविभागाशी संपर्क करा