

पुणे: देशभरातील काही निवडक प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूची आकडेवारी दै.‘पुढारी’च्या हाती आली असून, यात सर्वाधिक दिल्लीतील ‘नॅशनल झुलॉजिकल पार्क’ या प्राणिसंग्रहालयात वर्षभरात (सन 2024-25) तब्बल 127 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गुजरातमधील प्राणिसंग्रहालयात 48, तर तिरुपतीमधील 42, मुंबईतील 23 तर नागपूरमधील 23 प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. यावरून पुण्याप्रमाणेच देशातील इतर प्राणिसंग्रहालयांतही प्राणिमृत्यूचे प्रमाण अधिकच असल्याचे दिसत आहे. (Latest Pune News)
दिल्लीतील ‘नॅशनल झुलॉजिकल पार्क’ या प्राणिसंग्रहालयात वर्षभरात 127 प्राण्यांचे मृत्यू झाले. गुजरातमधील सरदार पटेल प्राणिसंग्रहालयात 48, तिरूपतीमधील वेंकटेश्वरा झुलॉजिकल पार्क येथील 42, तर गोरेवाडा झू नागपूरमध्ये 23, मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात 23 तर सुरतमधील श्यामा प्रसाद मुखर्जी झुलॉजिकल पार्कमध्ये 20 प्राण्यांचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून पुण्यासह देशभरातील प्राणिसंग्रहालयांतही प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे आढळल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नुकताच अवघ्या पाच ते सहा दिवसांत 16 चितळांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर देशभरातील प्रसिद्ध आणि काही निवडक प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूबाबतचा आढावा, दै.’पुढारी’कडून घेण्यात आला. त्या वेळी पुण्यापेक्षाही अधिक इतर काही प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे सादर केलेल्या सन 2024-25 या कालावधीतील अहवालांचा दै.’पुढारी’कडून अभ्यास करण्यात आला. त्या वेळी ही माहिती समोर आली.
...म्हणून मरतात तृणभक्षक प्राणी
प्राणिसंग्रहालयांत तृणभक्षक वर्गातील प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते, याबाबत तज्ज्ञांनीही दुजोरा दिला असून, त्यांच्या मते तृणभक्षक वर्गातील प्राणी घाबरट असतात. घाबरल्यामुळे त्यांना शॉक बसतो. यशिवाय एका प्राण्याला संसर्ग झाला, तर लगेचच दुसर्यालाही होतो.
त्यामुळे तृणभक्षक वर्गातील हरिण प्राण्यावर उपचार करणे अवघड असतेच. त्यांचे लसीकरण करता येत नाही. उपचारासाठी हाताळतानाही काही प्राणी दगावतात. मात्र, राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीमच्या अनुभवाने अशा प्राण्यांवर तातडीचे उपचार करणे सोपे झाले आहे. असे तज्ज्ञांनी दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आकडे काय सांगतात..?
गुजरातमध्ये प्राणिसंग्रहालयात 48, तर तिरुपतीमध्ये 42 प्राण्यांचे मृत्यू
मुंबईत 23, तर नागपूरला 23 प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे मृत्यू
तृणभक्षक प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक
राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालांमधील माहितीनुसार, प्राणिसंग्रहालयांत झालेल्या प्राण्यांच्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक तृणभक्षक (विविध प्रकारची हरणे- जसे की, चितळ, भेकर, चिंकारा, काळवीट, सांभर) प्रकारातील प्राण्यांचेच मृत्यू झाले आहेत.
मी गेल्या 25 वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. आता निवृत्त झालो आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या निरीक्षणांत प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राण्यांचे आयुर्मान वाढते. कारण, प्राणिसंग्रहालयांत प्राण्यांची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ असते. शिवाय, डॉक्टर देखील असतात. प्राणिसंग्रहालयांत तृणभक्षक प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आढळते. कारण, हे प्राणी खूपच संवेदनशील असतात. घाबरल्यामुळे त्यांना शॉक बसतो अन् त्यांचा मृत्यू होतो. याशिवाय संसर्गजन्य आजारही या प्राण्यांना झाले तर तो तत्काळ समजणे आणि त्यांच्यावर तत्काळ उपचार करणेही अवघड असते.
- अनिल अंजनकर, नि. वनसंरक्षक, भारतीय वनसेवा (आयएफएस)
जन्म असेल तर मृत्यू हा होणारच आहेत. प्राणिसंग्रहालयातील बहुतांश प्राण्यांचे मृत्यू हे आयुर्मान संपल्यामुळेच होतात. मनुष्यापेक्षा प्राण्यांचे आयुर्मान कमी असते. यात तर तृणभक्षक वर्गातील प्राण्यांचे आयुर्मान साधारणत: 8 ते 10 वर्षांचे असते. परंतु, राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आणि अनुभवी डॉक्टरांमुळे त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे, आता सोपे झाले आहे.
- डॉ. शिरीष उपाध्याय, संचालक, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर