

Tragic death after NEET exam
यवतमाळ : एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने नीट (NEET) परीक्षेचा पेपर निराशाजनक गेल्यामुळे गळफास घेऊन जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना दिग्रस शहरात रविवारी मध्यरात्री घडली.
लकी सुनिल चव्हाण (वय १९, रा. महेशनगर, दिग्रस, यवतमाळ) असे जीवन संपवणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे दिग्रस शहरात शोककळा पसरली आहे. नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) ही वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. रविवारी, ४ मे रोजी ही परीक्षा पार पडली.
यवतमाळ जिल्ह्यातून एकूण २,८५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. लकीनेही ही परीक्षा दिली. परीक्षेनंतर तो घरी परतला. पेपर बरोबर न गेल्याची चिंता त्याला स्वस्त बसू देत नव्हती, त्यामुळे तो नैराश्यात आला होता. दरम्यान त्याच दिवशी मध्यरात्री राहत्या घरी लकीने घराच्या स्लॅबला नायलॉन दोरीने गळफास लावून जीवन संपवले. कुटुंबीयांना सोमवारी सकाळी ही घटना कळताच त्यांनी तातडीने त्याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतकाच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.