

Umarkhed Domestic violence murder
यवतमाळ : घरगुती वादातून संतापाच्या भरात सख्ख्या भावानेच भावाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करून खून केला. उमरखेड तालुक्यातील विडुळ येथे ही ह्रदयद्रावक घटना घडली. विनोद दत्ता नरवाडे असे मृताचे नाव आहे.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास विडुळ येथील सम्राट चौकात विनोद आणि अविनाश या दोन सख्ख्या भावांमध्ये घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात लहान भाऊ अविनाश याने जवळच असलेला लाकडी दांडका उचलून विनोदच्या डोक्यावर जोरात हल्ला केला.
या हल्ल्यात विनोद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला असता, त्याला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले होते. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली. घटनेनंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची विधी आटोपला. शुक्रवारी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अविनाश नरवाडे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक रामोड करीत आहेत. या घटनेमुळे विडूळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.