Yavatmal District Bank President | यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; 'या' नावांची चर्चा

महायुतीचे १६, महाविकास आघाडीचे ८ संचालक; संजय देशमुख, राजुदास जाधव यांच्या नावांची चर्चा — भुतडा, गाडबैले यांना उपाध्यक्षपदाची संधी? संजय राठोड यांची भूमिका निर्णायक?
Yavatmal District Bank Election
Yavatmal District Bank Election Pudhari
Published on: 
Updated on: 

Yavatmal DCC Bank Election

प्रशांत भागवत

उमरखेड (यवतमाळ) : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीप्रणित बळीराजा सहकार पॅनलने बहुमत मिळवून महाविकास आघाडीप्रणित शेतकरी सहकार विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आणली आहे. संचालक मंडळातील २५ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळविला असून, महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एका अपक्ष संचालकाचाही बँकेच्या सत्तेच्या गणितात सहभाग राहणार आहे. दरम्यान, बहुमत मिळाल्यानंतर आता अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांची भूमिका, भाजपचा संभाव्य दावा आणि मित्रपक्षांमधील सत्तावाटपाचे समीकरण यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदासाठी संजय देशमुख की राजुदास जाधव?

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय देशमुख आणि संचालक राजुदास जाधव यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. या दोघांपैकी एका नेत्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी पालकमंत्री संजय राठोड आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत राठोड यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Yavatmal District Bank Election
Yavatmal DCC Bank Election | यवतमाळ जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा; अपक्ष उमेदवाराची बाजी; 'मविआ'ला ८ जागा

दुसरीकडे, बँकेच्या सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळविण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवारीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवेळी भाजप कोणती भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपकडे तीन संचालक असल्याचे सांगितले जात असले, तरी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर होणाऱ्या चर्चेतून अध्यक्षपदाचे समीकरण बदलू शकते. भाजपला अध्यक्षपद मिळाल्यास नितीन भुतडा यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अध्यक्षपदाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

दोन उपाध्यक्षपदांमुळे सत्तावाटपाचे गणित महत्त्वाचे

जिल्हा बँकेत दोन उपाध्यक्ष असणार असल्याने महायुतीतील सत्तावाटपाच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे राहिल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला प्रत्येकी एक उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

Yavatmal District Bank Election
Yavatmal DCC bank Election : उमरखेडमध्ये ईश्वरचिठ्ठीने राम देवसरकरांचा विजय!

या संभाव्य समीकरणात भाजपकडून नितीन भुतडा यांच्या नावाची उपाध्यक्षपदासाठी चर्चा आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद मिळाले नाही, तरी उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून बँकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते नानाभाऊ गाडबैले यांचे नाव दुसऱ्या उपाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचे समजते. तथापि, अध्यक्षपद आणि दोन्ही उपाध्यक्षपदांचे वाटप कोणत्या सूत्रानुसार होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे मित्रपक्षांमधील चर्चा आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बहुमत महायुतीचे; प्रतिष्ठेच्या लढतीत मात्र धक्का

११ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानानंतर सोमवारी समर्थ प्राइड सभागृहात मतमोजणी पार पडली. विविध गटांमध्ये विजय मिळवत महायुतीने संचालक मंडळात स्पष्ट बहुमत प्राप्त केले. मात्र, उमरखेड तालुका गटातील अटीतटीच्या लढतीने या निकालाची विशेष चर्चा रंगली.

या गटात महायुतीचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि महाविकास आघाडीचे राम देवसरकर यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २५ मते मिळाल्याने निकालात बरोबरी झाली. फेरमतमोजणीनंतरही मतांची समानता कायम राहिल्याने अखेर ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला. त्यात राम देवसरकर यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

या निकालामुळे महायुतीच्या बहुमतासोबतच प्रतिष्ठेच्या लढतीतील पराभवाचीही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदावरील त्यांचा दावा आणि भाजपची अपेक्षित भूमिका यांच्यात समन्वय कसा साधला जाणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

नव्या संचालक मंडळासमोर आर्थिक स्थिती सुधारण्याचे आव्हान

बँकेतील सत्तांतरानंतर नव्या नेतृत्वासमोर पदवाटपाबरोबरच आर्थिक स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान असेल. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करणे, थकीत कर्जांचे प्रमाण कमी करणे आणि बँकेची आर्थिक घडी पुन्हा मजबूत करणे, या मुद्द्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

Yavatmal District Bank Election
Yavatmal DCC Bank Election : यवतमाळ जिल्हा बँक निवडणूक ! उमरखेड-महागाव गटात १०० टक्के मतदान!

बँकेशी संबंधित सुमारे ५५० कोटी रुपयांच्या तुटीचा मुद्दाही नव्या संचालक मंडळासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे राजकीय समीकरणे जुळविण्याबरोबरच बँकेच्या आर्थिक कारभारात सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी नव्या नेतृत्वावर असेल.

महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले, तरी अध्यक्षपदासाठी मित्रपक्षांमध्ये सुरू असलेली चुरस आणि उपाध्यक्षपदांच्या संभाव्य वाटपामुळे अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा बँकेची अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड ही केवळ पदनियुक्ती न राहता महायुतीतील अंतर्गत समन्वयाची कसोटी ठरणार आहे. संजय देशमुख, राजुदास जाधव, नितीन भुतडा आणि नानाभाऊ गाडबैले यांच्या नावांभोवती रंगलेल्या चर्चांना अधिकृत निर्णयानंतरच पूर्णविराम मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news