

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारमधील तिघेजण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज चामोर्शी शहरात घडली.
विनोद पुंजाराम काटवे (४५), राजू सदाशिव नैताम (४५) व सुनील वैरागडे (५५) सर्व रा. गडचिरोली अशी ठार झालेल्यांची नावे असून, अनिल मारोती सातपुते (५०) वर्ष, रा.चामोर्शी हे गंभीर जखमी झाले आहेत. विनोद काटवे हे भाजपचे माजी नगरसेवक तथा गडचिरोली शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचे लहान भाऊ आहेत.
चारही जण कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते. दरम्यान, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक यू टर्न घेतल्याने मागून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार पूर्णतः क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी अनिल सातपुते यांच्यावर चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चामोर्शी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.