

Yavatmal Vani Couple Death
यवतमाळ : केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील एकाच कुटुंबातील पतीपत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला. आज (दि. १५) सकाळी ही दुर्देवी घटना घडली. त्यांच्या अपघाती निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. तर मुलगा विवान हा पांढरकवडा येथील आजोबाकडे असल्याने तो सोबत नव्हता.
वणी शहरातील कोळसा व्यावसायिक राजकुमार जयस्वाल हे आपल्या कुटुंबासह केदारनाथ येथे गुरुवारी (दि. १२) दर्शनाला गेले होते. दर्शन घेतल्यानंतर केदारनाथ मंदिरातून भाविकांना घेऊन गौरीकुंडला येत असलेल्या आर्यन एव्हिएशनच्या हेलीकॉप्टरचा भीषण अपघात झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ तहसीलमधील गौरीकुंड जंगलात हे हेलीकॉप्टर कोसळले. या भीषण अपघातात पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू झाला.
या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रवी नगर येथे राहणाऱ्या कोळसा व्यापारी व कोळसा वाहतूकदार राजकुमार सुरेश जयस्वाल (वय ४१), पत्नी श्रद्धा राजकुमार जयस्वाल (वय ३४), मुलगी काशी जयस्वाल (२ वर्ष ३ महिने) या एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर ते गुप्तकाशीकडे परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली.
राजकुमार जयस्वाल हे अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे होते. धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर राहायचे. वणी येथे महाशिवपुराण कथा आयोजनात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांच्या अपघाती निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील मुलगा विवान हा पांढरकवडा येथील आजोबाकडे असल्याने तो सोबत नव्हता.
गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान ही दुर्घटना घडली. गौरीकुंड खोऱ्यात दाट धुके आणि वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर भरकटले. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. खराब हवामान हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.