

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकारातून, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर), शिक्षण विभाग जिल्हा परिषद (यवतमाळ) तसेच विशुद्ध विद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांचे जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवॉर्ड’ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच बालवैज्ञानिक आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित करण्याची संधी देणे हा आहे. यंदाचे प्रदर्शन विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयात होणार आहे.
या प्रदर्शनात तीन जिल्ह्यांतील एकूण १६१ बालवैज्ञानिकांनी साकारलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची राज्यस्तरासाठी निवड केली जाणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते भूषवतील.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, राज्य विज्ञान संस्था नागपूरचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या शास्त्रज्ञ शिवाणी सिंग आणि विशुद्ध संस्थेचे सचिव विजय कासलीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
समारोप व बक्षीस वितरण समारंभ १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे असतील. प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, जि.प. मुख्य लेखा अधिकारी तुकाराम भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, तसेच वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
१३ नोव्हेंबर : दुपारी २ ते ५.३० या वेळेत प्रदर्शन खुले
१४ नोव्हेंबर : सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत प्रदर्शन खुले
१३ नोव्हेंबर संध्याकाळी : रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम
प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्रकाश मिश्रा, किशोर पागोरे, तसेच मुख्याध्यापक मीनाक्षी काळे आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व विज्ञानप्रेमींना या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले आहे.