

Huge increase in passenger fares of private bus drivers
उमरखेड, पुढारी वृत्तसेवा :
उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नकार्ये, तसेच सणासुदीचा काळ यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. याचा गैरफायदा घेत उमरखेडवरून पुणे जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी बस चालकांनी प्रवासी भाड्यात प्रचंड वाढ केल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. उमरखेड येथून भारूका ट्रॅव्हल्स, खुराणा ट्रॅव्हल्स, महाराष्ट्र ट्रॅव्हल्स, समर्थ ट्रॅव्हल्स यासारख्या लक्झरी बस सेवा दररोज संध्याकाळी उमरखेडहून पुण्याच्या दिशेने निघतात. या बारा तासांच्या प्रवासासाठी वातानुकूलित गाड्यांचे दर तब्बल १३०० ते सोळाशे रुपये भाडे आकारण्यात येत आहेत. तर विना एसी गाड्यांचे दर त्यापेक्षा फक्त शंभर रुपये कमी आहेत.
दररोज कामानिमित्त, शिक्षणासाठी, वैद्यकीय गरजांमुळे किंवा कौटुंबिक कारणास्तव प्रवास करणण्या सामान्य नागरिकांना या मनमानी दरवाढीमुळे मोठाच आर्थिक फटका बसत आहे. पुण्यावरून परतीच्या प्रवासाचे दर मात्र तिनशे ते चारशे रुपयांनी कमी असतात, हे विशेष... यावरून कंपन्यांकडून एकाच मार्गासाठी वेगवेगळ्या दराने लूट सुरू असल्याचे स्पष्ट आहे.
प्रवाशांची मागणी : प्रवासदरांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तयार करावी. खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना नियमबद्ध करावे. दर वाढीबाबत परिवहन विभागाने नियमित तपासणी करावी. प्रवाशांसाठी तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. आम्हाला पुण्याला वेळेवर पोहोचायचं असतं, पण दर ऐकूनच माघारी फिरावं लागतं, असे एका विद्याध्यनि संतप्त प्रतिक्रियेत सांगितले. दरवाढ थांबवण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अन्यथा ही प्रवासी लूट आणखी गंभीर रूप धारण करेल. अशी भीती आहे.
दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन यासारख्या सणासुदीच्या काळात याच ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांकडून २५०० ते ३००० रुपये दरम्यान प्रवासदर वसूल करतात. ही दरवाढ कोणत्याही शासकीय नियमावलीविना, केवळ मागणी जास्त आणि जागा कमी या तत्त्वावर आधारित असल्याने ही सरळसरळ ग्राहकांची आर्थिक लूट आणि फसवणूक आहे. उमरखेड आणि पुसद या दोन्ही ठिकाणांहून पुण्यासाठी ट्रॅव्हल्स सेवा उपलब्ध असून, दोन्ही प्रवासात फारसा फरक नसतानादेखील दरांमध्ये ४०० रुपयांपर्यंत तफावत आहे.