

12th student ends life
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळांने आज बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला. निकाल माहित होण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने जीवन संपवले. ही घटना आज सोमवारी दुपारी यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली.
हिना ज्ञानेश्वर आडे (वय १७) असे जीवन संपवणा-या विद्यार्थिनीचे नाव आहे. नेर येथील दि इंग्लिश स्कूल येथे बारावीत शिक्षण घेत होती. आज सोमवारी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. हिनाकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने तिने आपल्या भावाला निकाल पाहण्यासाठी सांगितले. भाऊ व वडील हे लग्नाला गेले होते. त्या ठिकाणी मोबाइलवर भावाने निकाल पाहिला. यामध्ये तीला ४७ टक्के गुण मिळाले, ती पास झाली होती.
गुण कमी मिळाल्याने भावाने घरी आल्यावर निकाल सांगतो असे तिला सांगितले. त्यामुळे आपण परीक्षेत नापास झाले की काय असा गैरसमज झाल्याने तिने घरी गळफास घेऊन जीवन संपवले. कुटूंबीय घरी परत आल्यावर हा प्रकार उजेडात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.