

पुढारी ऑनलाईन डेस्क
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मुलगी शांताबाई साठे यांचे मुंबई येथे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. अण्णाभाऊंच्या जगप्रसिद्ध ‘फकीरा’ कादंबरीच्या त्या लेखन साक्षीदार होत्या. घाटकोपरच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीत 1958 च्या दरम्यान अण्णाभाऊ ‘फकीरा’ कादंबरी लिहित होते. सतत तीन महिने अहोरात्र लेखन करून शेवटी अण्णाभाऊ अतिश्रमाने खाली कोसळले होते. तेव्हा याच शांताबाईंनी त्यांना सावरले होते.
शांताबाई या अविवाहित होत्या. ४ मे रोजी कांदिवली येथे सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बोरिवलीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अण्णाभाऊंच्या दुसऱ्या पत्नी जयवंताबाई दोडके यांना शांता आणि शकुंतला या दोन मुली. शांता या थोरल्या होत्या त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहून कम्युनिस्ट व लाल बावटा पक्षासाठी काम करत राहिल्या. तसेच अण्णाभाऊ यांच्या एका नाटकात त्यांनी कामही केले होते.
चळवळीमध्ये काम करत असताना त्यांनी प्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी, कॉम्रेड रेड्डी व शाहीर अमर शेख, कॉम्रेड गव्हाणकर व इतरांच्या सोबत तुरुंगवासही भोगला होता. अविवाहित शांताबाई आपली बहीण शंकुतला सपताल यांच्या मुलांकडे राहत. संजय, राजेश आणि प्रशांत ह्या सपताल बंधूनी आपल्या मावशीची, शांताबाईंची खूप काळजी घेतली होती. वडील मोठे साहित्यिक असूनही शांताबाई यांनी कधीही शासकीय मदतीची अपेक्षा केली नाही.