

प्रशांत भागवत
उमरखेड ः यवतमाळ जिल्ह्यातील शेंदुरसणी ग्रामपंचायतीतील बनावट जन्ममृत्यू नोंदी प्रकरण ताजे असतानाच आता उमरखेड तालुक्यातील भवानी ग्रामपंचायतीतही तसाच गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतीच्या सीआरएस ( ) पोर्टलवरील नोंदी तपासल्या असता 1 जानेवारी 1990 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत तब्बल 6 हजार 206 जन्मनोंदी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कालावधीत फक्त दोन मृत्यू नोंदी झाल्याचे नोंदवले गेले असून, ही बाब अत्यंत संशयास्पद व धक्कादायक आहे.
सीआरएस सॉफ्टवेअरचा गैरवापर?
भवानी ग्रामपंचायतीअंतर्गत रामपूर येथील नोंदींमध्ये हा प्रकार आढळून आला आहे. सामान्यतः एखाद्या गावात जन्म आणि मृत्यू नोंदींचे प्रमाण जवळपास समतोल असते. मात्र येथे हजारो जन्मनोंदी आणि केवळ दोन मृत्यू नोंदी असल्याने सीआरएस सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी तालुक्यातील शेंदुरसणी ग्रामपंचायतीतही अशाच प्रकारचा बनावट नोंदींचा घोटाळा उघडकीस आला होता. त्या प्रकरणात बिहारमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या जन्ममृत्यू नोंदींची तपासणी सुरू करण्यात आली असून, त्याच तपासादरम्यान भवानी गट ग्रामपंचायतीतील रामपुर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.
बनावट जन्मनोंदींचा वापर करून आधार कार्ड, शैक्षणिक दाखले, मतदान ओळखपत्र, शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात आला असल्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा नसून, मोठ्या आर्थिक व कायदेशीर गैरप्रकाराचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भवानी ग्रामपंचायतीतील बनावट जन्ममृत्यू नोंदी प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासन सतर्क; आरोग्य विभागाकडून चौकशी
या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोग्य सेवा उपसंचालकांनी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे येथील आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. बी. एस. कमलापूरकर यांनी या प्रकरणासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डोळे यांना दिनांक 31 डिसेंबर रोजी पत्र पाठवून सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत.
इतर ग्रा.पं.चीही तपासणी सुरू
या प्रकारानंतर जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग व जन्ममृत्यू नोंदणी विभाग सतर्क झाला आहे. भवानी ग्रामपंचायतीपुरतेच नव्हे तर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही अशा प्रकारच्या संशयास्पद नोंदी झाल्या आहेत का,? याची पडताळणी सुरू आहे. आवश्यक असल्यास सीआरएस सॉफ्टवेअरवरील जुन्या नोंदींचा ऑडिट केला जाणार आहे.