केंद्रात महाराष्ट्राचे कृषिमंत्री होते तेव्हा शेतकर्‍यांची लूट : पंतप्रधान मोदी

केंद्रात महाराष्ट्राचे कृषिमंत्री होते तेव्हा शेतकर्‍यांची लूट : पंतप्रधान मोदी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील 'यूपीए'च्या भ्रष्ट सरकारात महाराष्ट्रातील कृषिमंत्री होते. तेथे शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर केले जायचे. मात्र, शेतकर्‍यांना कधीच थेट लाभ मिळाला नाही. शेतकर्‍यांच्या नावावर दिल्लीतून जाहीर होणारे पॅकेज मध्येच लुटले जात होते, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नाव न घेता बुधवारी येथे केला. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे आता डबल इंजिन सरकारची डबल इंजिन गॅरंटी असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकर्‍यांच्या खात्यात 21 हजार कोटी रुपये क्षणार्धात पोहोचले. हीच माझी गॅरंटी आहे. जर काँग्रेसचे शासन दिल्लीत असते, तर त्यांनी 21 हजार कोटींपैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला. भारी शिवारात आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. मोदींच्या हस्ते 'नमो शेतकरी महासन्मान निधी'चे वितरण करण्यात आले. 'पंतप्रधान किसान सन्मान निधी' योजनेच्या 16 व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रतिशेतकरी सहा हजार रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झाले.

मोदी म्हणाले, 'एनडीए' सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय चालले होते, ते एकदा आठवा. सध्या जी 'इंडिया' आघाडी तयार झाली आहे, त्यांचेच याआधी केंद्रात सरकार होते. तेव्हाचे कृषिमंत्री महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीतून विदर्भातील शेतकर्‍यांच्या नावाने पॅकेज घोषित केले जात होते. तथापि, ते मध्येच लुटले जात होते.

'अबकी बार चारसो पार…'

मोदी म्हणाले, मी दहा वर्षांपूर्वी 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमासाठी यवतमाळमध्ये आलो होतो. त्यावेळी तुम्ही आशीर्वाद दिला आणि देशवासीयांनी 'एनडीए'ला 300 पार नेले. त्यानंतर पुन्हा मी 2019 मध्ये फेब्रुवारीच्या महिन्यात यवतमाळला आलो, त्यावेळी तुम्ही पुन्हा प्रेम दिले आणि 'एनडीए'ला 350 पार नेले. आता मी लोकसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा यवतमाळला आलो असून, देशातून एकच आवाज येत आहे आणि तो म्हणजे 'अबकी बार 400 पार…'

आम्ही शिवरायांना मानणारे लोक

आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणारे लोक आहोत. त्यांच्या शासनास 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्व काही मिळाल्यानंतर शिवराय सत्तेचा भोग घेऊ शकत होते. मात्र, त्यांनी सत्तेला नाही, तर राष्ट्राच्या चेतनेला सर्वोच्च ठेवले. आम्हीही देश बनवण्यासाठी देशवासीयांचे जीवन बदलण्यासाठी एक मिशन घेऊन निघालो आहे. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत जे काही केले ते येणार्‍या 25 वषार्र्ंचा पाया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

'लखपती दीदी' बनविण्याची गॅरंटी

गावागावांतील मातांना 'लखपती दीदी' बनवण्याची गॅरंटी मी दिली आहे. देशातील 1 कोटी महिला 'लखपती दीदी' झाल्या आहेत. लवकरच आम्ही 3 कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवणार आहोत. महाराष्ट्रातील बचत गटांतील महिलांच्या समूहासाठी 800 कोटींहून अधिक मदत दिली आहे, असेही मोदी यांनी सांगितले. महिला ई-रिक्षा चालवत असून, 'नमो ड्रोन दीदी' योजनेमुळे ड्रोनही चालवतील. ते शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतील. ज्यांची नेहमीच उपेक्षा झाली अशा गरिबांसाठी आमचे सरकार गेली दहा वर्षे समर्पित आहे. काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला मागे ठेवले गेले. आता तसे घडणार नाही. आगामी काळात देशाचा वेगाने विकास होईल, असे मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news