यवतमाळ: मालवाहू अ‍ॅपे पुलावरून कोसळला; 6 जणांचा मृत्यू | पुढारी

यवतमाळ: मालवाहू अ‍ॅपे पुलावरून कोसळला; 6 जणांचा मृत्यू

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पुलावरून मालवाहू अ‍ॅपे कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील बेलगव्हाणजवळ (ता. पुसद) मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सर्वजण नवस फेडायला वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीला जात होते.

सर्व मृत व जखमी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ज्योतीबाई नागा चव्हाण (वय 60), उषा विष्णू राठोड (50, दोघी रा. जवाहरनगर धुंदी), पार्वतीबाई रमेश जाधव (55, रा. वसंतपूर), वसराम देवसिंग चव्हाण (65, रा. सिंगरवाडी धानोरा), लीलाबाई वसराम चव्हाण (60, सिंगरवाडी धानोरा), सावित्रीबाई गणेश राठोड (45, जवाहरनगर धुंदी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये तीन चिमुकल्यांसह गाडीचालकाचाही समावेश आहे.

पुसद तालुक्यातील जवाहरनगर धुंदी येथील गणेश लच्छीराम राठोड यांच्या घरी जमलेले 18 पाहुणे धुंदी येथून पोहरादेवीकडे मालवाहू अ‍ॅपेतून निघाले. वाहन भरधाव असतानाच बेलगव्हाण घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. जंगलातील लहान पुलावरून वाहन कोसळले. यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 12 जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून नांदेडला हलविण्यात आले.

Back to top button