तलवारीच्या धाकेवर शेतकऱ्याच्या ३० शेळ्या पळविल्या

file photo
file photo
Published on
Updated on

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : जागलीवर असलेल्या शेतकऱ्याच्या गळ्यावर तलवार ठेवून ३० शेळ्या चोरट्याने पळवल्या. ही धक्कादायक घटना महागाव तालुक्यातील शिरपूर शिवारात गुरुवारी (दि.2) मध्यरात्री घडली. संतोष किसन पवार (रा. गुंज) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
पवार यांचे शेत शिरपूर शिवारमध्ये आहे. कुटुंबामध्ये लग्न कार्य असल्यामुळे घरचे सगळे बाहेरगावी गेले होते. शेतात बांधून असलेल्या ३० शेळ्या, कोंबडे इतर साहित्य असल्यामुळे ते शेतामध्ये जागलीवर गेले होते. ते एकटेच असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने मोठ्या वाहनाच्या मदतीने शेतात बांधलेल्या बकऱ्या, कोंबड्या तलवारीच्या धाकावर पळवल्या.

या घटनेमुळे सदर शेतकऱ्याला मानसिक धक्का बसला आहे. जागलीवर बांधून असलेल्या बकऱ्याचे दावे तलवारीने तोडून बकऱ्या वाहनांमध्ये कोंबण्यात आल्या. हा प्रकार सुरू असताना एकाने संतोष पवार यांच्या गळ्यावर तलवार ठेवली होती. तसेच चिकटपट्टीने त्याचे तोंड व हातपाय बांधले होते.

या प्रकारामुळे ते चांगलेच हादरून गेले आहेत. या घटनेची फिर्याद महागाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या चोरीमुळे परिसरातील जागलीवर असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. शेती अवजारे व शेतकऱ्यांची मालमत्ता चोरीला जात असताना एकाही चोरीचा सुगावा मात्र पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे चोरट्याचे मनोबल चांगलेच वाढले आहे. लोकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यास महागाव पोलिसांना सतत अपयश येत असल्यामुळे पोलिसांप्रती नागरिकांमध्ये चांगलीच चीड निर्माण झाली आहे. संतोष किसन पवार या शेतकऱ्याच्या गळ्यावर तलवार ठेवून बकऱ्या चोरीचा झालेला हा प्रकार तसा अतिशय गंभीर मानला जात आहे  सहा महिन्यांपूर्वी याच शेतकऱ्याचे शेत अतिवृष्टीमुळे पूर्णतः खरडून गेले आहे. आता हे नवीनच संकट त्याच्यासमोर उभे टाकल्यामुळे शेळ्या चोरीतून किमान त्याचे चार लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महागाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news