यवतमाळ: वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यास ८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

यवतमाळ: वीज कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यास ८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : अनधिकृतपणे वीज पुरवठा घेणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून धक्काबुक्की केली. या प्रकरणी एकास जिल्हा न्यायालयाने ८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. संदिप ठाकरे (वय ४०, रा. ब्राम्हणवाडा, ता. नेर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

वीज बिलाची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने वीज कंपनीचे नेर येथील उपकार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये विशेष मोहीम राबविली होती. यासाठी नियुक्त केलेल्या पथकामध्ये ५ जणांचा समावेश होता. त्यातील सहायक अभियंता श्रीकांत संत हे पथकासह ब्राम्हणवाडा पश्चिम नेर येथील वीज ग्राहक रामराव ठाकरे यांच्या विद्युत जोडणीची पडताळणीकरीता गेले असता सदर ग्राहकाचा आठ महिन्यांपूर्वीच वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

मात्र, त्यानंतरही तेथे अनधिकृत वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळले. याप्रकरणी पथक कार्यवाही करत असताना संदीप ठाकरे याने पथकास शिवीगाळ केली. तसेच प्रधान तंत्रज्ञ जी. पी. चहाकार यांची कॉलर पकडून धक्का दिला. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. यामुळे पथकाला पुढील शासकीय कार्यवाही करता आली नाही. सदर प्रकरणी नेर पोलीस ठाण्यात किशोर संत यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news