

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना मास्टरब्लॉस्टर सचिन तेंडुलकर याच्या विशेष उपस्थितीत पार पडणार आहे. सायंकाळी सचिन ताडोबात वन्यप्राणी गणनेकरिता सहभागी होण्यासाठी दाखल झाल्याची माहिती सर्वत्र पसरताच निसर्ग, पर्यटनप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला. सचिनच्या उपस्थितीत होणार्या प्राणी गणनेच्या आठवणी वर्षानुवर्षे स्मरणात राहणार्या आहेत.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बफर व कोअर झोनमध्ये उद्या वन्यप्राणी गणना होत आहे. ताडोबातील वाघांचा मोठा फॅन असलेल्या सचिनला बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून वन्यप्राणी गणनेचा आनंद घ्यायचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अनेक वर्षांपासून बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात भ्रमंतीवर निघणार्या वन्यप्राण्यांना पाहण्यासोबतच गणना करण्याचे काम याच रात्री केले जाते. विशेष म्हणजे, बफर झोनमध्ये निसर्गप्रेमी, पर्यटनप्रेमी व अशासकीय संस्था यांच्या साहाय्याने ही गणना केली जात आहे.
गुरुवारी सचिनचे आगमन झाल्याने त्याच्या चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली. त्यांनतर लगेच नागपूर येथून सचिन ताडोबाच्या दिशेने रवाना झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सचिनचे चिमूरपासून 4 कि.मी. अंतरावरील बांबू रेस्टहाऊस येथे आगमन झाले. ताडोबाच्या सीमेवर त्याचा आजचा मुक्काम आहे. उद्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळ सफारी करण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळ ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या मचाणीवर बसून रात्रभर निसर्गानुभवात वन्यप्राण्यांच्या दर्शनासोबतच गणना करण्याची शक्यता आहे.
राज्यातील 4 व्याघ्र प्रकल्पांत गणना
चंद्रपूर : उद्या 5 मे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री राज्यातील ताडोबासह 4 व्याघ्र प्रकल्पांत वन्यप्राणी गणना होत आहे. याकरिता वन विभागाने 71 मचाणी तयार केल्या आहेत. वर्धेतील बोर, गोंदियातील नवेगाव नागझिरा व नागपूर जिल्ह्यातील करांडला अभयारण्यातील प्राणी गणनेला वळवाच्या पावसामुळे ब्रेक लागला आहे. पेंच, मेळघाट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राणी गणना करण्यात येत आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये 142 निसर्गप्रेमी वन्यप्राणी गणना करणार आहेत. अत्यंत संवेदनशील असलेल्या कोर झोनमध्ये वनाधिकारी स्वत:च गणना करतील, अशी माहिती ताडोबाचे प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दै.'पुढारी'शी बोलताना दिली. याकरिता ऑनलाईन व ऑफलाईन बुकिंग झालेले आहे.