

वर्धा, पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्यांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे. नागपूर आरटीओ ग्रामीण आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळलेल्या २० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर Samruddhi Expressway १२० ची वेग मर्यादा देण्यात आली आहे. पण, रस्ता मोकळा असल्याने अनेक जण ही वेग मर्यादा ओलांडून वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. अती वेगातील वाहनांचे अपघात होऊन अनेकांना जीवालाही मुकावे लागले आहे. अशा स्थितीत वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्यांना चाप बसावा, याकरिता मोहीम राबवित कारवाई करण्यात येत आहे.
वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नागपूर आरटीओ ग्रामीणच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात आली. आयसी टू आणि थ्रीच्या मध्ये ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी २० वाहनधारकांनी वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. Samruddhi Expressway
नागपूर ग्रामीण आरटीओसोबत राबविलेल्या संयुक्त मोहिमेत वर्ध्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात वर्धा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक गोपाल धुर्वे, साधना कावळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक विशाल भगत, पांडुरंग वाघमारे, नरेंद्र तिवारी यांनी सहभाग नोंदविला. Samruddhi Expressway