

Electrical short circuit Fire Washim
वाशिम : शहरातील सिंधी कॅम्प आणि सिंधी कॉलनी परिसरातील वीज समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील मुख्य डीपी (ट्रान्सफॉर्मर) मध्ये रात्री अचानक मोठा स्फोट झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर केबलला आग लागून जिवंत वीज तार थेट रस्त्यावर पडल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत नगर परिषद सदस्य निलेश जीवनानी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात या भागात कोणतीही दुर्घटना किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याला महावितरण प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सिंधी कॉलनी परिसरातील वीज केबल गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत आहे. याबाबत २१ सप्टेंबर २०२३ रोजी महावितरणकडे लेखी तक्रार करून नवीन केबल टाकण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दरम्यान, परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सुमारे २०० घरांचा अतिरिक्त भार डीपीवर पडत असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना उकाडा आणि अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून नवीन केबल टाकण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
या संदर्भात नागरिकांच्या सह्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता कार्यालयात सादर करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांसह नगर परिषद सदस्य निलेश जीवनानी यांनी दिला आहे.