

Truck Bus Collision Sambhajinagar Nagpur Highway
वाशिम : संभाजीनगर-नागपूर द्रुतगती महामार्गावर पेडगाव गावाजवळ आज (दि.२३) सकाळी ७ वाजता ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात मुकेश नाटे (वय ३६, कारंजा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अशोक वानखडे (वय ५५, ट्रॅव्हल्स चालक) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून कारंजा येथे जाणारी सिंध कंपनीची ट्रॅव्हल्स ( MH 37W 7772) आणि नागपूरहून संभाजीनगरकडे जाणारा ट्रक (CG 04 MH 0391) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट ट्रॅव्हल्सवर आदळला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले, तर २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे हलवण्यात आले आहे.तर किरकोळ जखमींवर कारंजा, शेलूबाजार आणि वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच कारंजा, शेलूबाजार, मंगरूळपीर येथील १०८ रुग्णवाहिका तसेच जय गुरुदेव समृद्धी, शिवनेरी, दादाजी, वेदांत, जय गजानन, जगद्गुरु नरेंद्राचार्य या रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.