

Rain in Washim
वाशिम : जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाची रिपरीप सुरू आहे. कुठे मध्यम तर कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरीचा पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. पिके वाचली असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने काही गावाचा संपर्क तुटला आहे. मेहकर मालेगाव हा राज्यमार्ग बंद झालेला आहे. या ठिकाणी दोन्हीकडे वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. पूर पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. पावसाचा जोर वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य महामार्ग खुला होण्याची शक्यता कमी आहे.
मागील तीन आठवड्यांभरापासून पावसाने पाठ फिरवली होती. काही तुरळ ठिकाणी वगळता जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, बुधवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस आज दुपारपर्यंत सुरू आहे. सद्यस्थितीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून बाजारपेठ मध्ये सन्नाटा दिसून येत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.