

Risod Tehsil Office Reel Shooting
अजय ढवळे
वाशिम : रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नावाने प्रसारित झालेल्या एका ‘प्रोफेशनल सिनेमॅटिक रील’वरून वाद निर्माण झाला आहे. तहसील कार्यालयातच या रीलचे चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप असून, त्यात शासकीय पदनामाचा फलक, कार्यालयातील खुर्ची, राष्ट्रीय ध्वज आणि बोधचिन्ह दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय सोशल मीडिया मार्गदर्शक सूचनांचा भंग झाला आहे का, याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २८ जुलै २०२५ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर फोटो, रील किंवा व्हिडिओ प्रसिद्ध करताना शासकीय पदनाम, लोगो, गणवेश तसेच शासकीय इमारत व वाहनांच्या वापराबाबत या सूचनांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत.
प्रसारित झालेल्या रीलमध्ये ‘तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी’ असा उल्लेख असलेला फलक तसेच कार्यालयातील अन्य शासकीय बाबी दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित रीलच्या चित्रीकरणासाठी शासकीय कार्यालयाचा वापर करण्यात आला का आणि त्यासाठी अधिकृत परवानगी होती का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शासकीय कामाचे सोशल मीडियावर प्रदर्शन करताना स्वयंप्रशंसा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही परिपत्रकात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या रीलच्या माध्यमातून शासकीय पदाचा किंवा कार्यालयाचा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापर झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोष आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सोयाबीन पिकांबाबत गंभीर परिस्थिती असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. राजपत्रित अधिकारी कार्यालयात रील बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसत असेल, तर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.
राजू चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, वाशिम