

Risod Nizampur Criminal killed
वाशीम : रिसोड तालुक्यातील निजामपूर शिवारात एका सराईत गुन्हेगाराची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आली आहे.
गेल्या १५ वर्षांपासून धुमसणाऱ्या जमिनीच्या वादाचा भयानक शेवट झाला असून, लोखंडी रॉड आणि इतर प्राणघातक हत्यारांनी रमेश किसन काळे (वय ३७) याचा निघृण खून करण्यात आला. केवळ हत्या करून आरोपी थांबले नाहीत, तर गुन्ह्याचा पुरावा समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाला जड दगड आणि दोरीने बांधून खदाणीतील विहिरीच्या खोल पाण्यात फेकून देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण वाशिम जिल्हा हादरला असून, रिसोड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत रमेश किसन काळे हा साधासुधा नागरिक नसून पोलीस दप्तरी नोंद असलेला एक कुख्यात सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशिटर) होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, दरोडा, जबरी चोरी आणि वाटमारीसारखे सुमारे २५ ते ३० अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. परिसरात त्याच्या गुन्हेगारीची दहशत होती. निजामपूर येथील मुंगसाजी नगर परिसरातील गायरान जमिनीच्या मालकी हक्कावरून रमेश काळे आणि आरोपींच्या कुटुंबात गेल्या १५ वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातूनच अनेकदा मारामारीच्या घटना घडल्या होत्या आणि अनेक प्रकरण न्यायालयातही प्रलंबित होते.
१० सप्टेंबरच्या रात्री १०:०० वाजेच्या सुमारास आरोपींनी रमेश काळे याला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. त्यानंतर १० सप्टेंबरच्या रात्रीपासून ते ११ सप्टेंबरच्या सकाळी ०७:०० वाजेच्या दरम्यान आरोपींनी संगनमत करून, दबा धरून रमेशवर जीवघेणा हल्ला चढवला. लोखंडी रॉड आणि काचेच्या बाटल्यांनी त्याच्या डोक्यावर व शरीरावर सपासप वार करून त्याला जागीच ठार मारण्यात आले. ११ सप्टेंबरच्या सकाळी रमेशचा मोबाईल बंद येत असल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध घेताना स्थानिक (निजामपूर) स्मशानभूमीच्या गेटजवळ मृतदेह ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. आरोपींनी पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला होता. माग काढत कुटुंबीय मुंगसाजीनगर जवळील एका खदाणीच्या विहिरीजवळ पोहोचले. विहिरीत शंका आल्याने दोरी ओढून पाहिली असता, दगडाला बांधलेला रमेशचा मृतदेह बाहेर आला. .
या प्रकरणी मृत रमेशची पत्नी लता रमेश काळे यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी महादु प्रल्हाद काळे, अंकुश कैलास काळे, सचिन प्रल्हाद काळे, बालाबाई प्रल्हाद काळे, चंगुलाबाई कैलास काळे (सर्व रा. निजामपूर, ता. रिसोड) आणि रवी कमल्या चव्हाण (रा. खरबी, जि. हिंगोली) या ६ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक विनायक साहेबराव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास करत आहेत.